महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदी , शहांना ३७० आणि शरद पवार यांच्याशिवाय विषयच सुचत नाही , पवारांची टीका

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे अहमदनगर नंतर त्यांनी वैजापुरात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेऊन काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
अमित शहा आणि मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले कि , हे दोन्ही नेते महाराष्ट्रात येऊन फक्त ३७० आणि शरद पवार या दोनच विषयावर बोलतात . महाराष्ट्रात आलात तर महाराष्ट्रातल्या समस्यांविषयी बोला, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी बोला, तरुणांच्या रोजगाराविषयी बोला पण नाही , या विषयावर ते काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर म्हणतात त्यांना निवडणुकीत मजा येत नाही. त्यांचे उमेदवार मैदानात तेल लावून तयार आहेत पण कुस्तीसाठी मैदानात कुणीही नाही. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो कि , आम्ही कुस्ती मर्दांशी खेळतो . हे दिसायला बरे दिसतात पण पैलवान नाहीत. मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे हे त्यांनी लक्षत घेऊन बोलावं .
दरम्यान या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही भाजप-सेनेची खिल्ली उडविली. ते म्हणाले कि युतीसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून दिले काहीच नाही. आता म्हणतात आम्ही १० रुपयात , पाच रुपयात जेवण देऊ . झुणका भाकरीचे काय झाले ? लोकांच्या , शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांच्याकडे काहीच कार्यक्रम नाही अशा लोकांना पुन्हा निवडून देण्यात काहीच अर्थ नाही.
याशिवाय अहमदनगरमधील बोधेगाव येथील प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना माझं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या नावाचा जप करत आहेत. त्यांना मी झोपेत सुद्धा दिसतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात सभा घेत आहेत. गेल्या काही सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या शरद पवार यांनी आज बोधेगाव (शेवगाव) येथील प्रचारसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलं. ‘पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. ही गोष्ट चांगली आहे. शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार, असा माझ्या नावाचा जप केला जातोय. मी सत्तेत नसतानाही ते दोघेही माझ्यावर टीका करतात. त्यांना झोपेतही मीच दिसतो,’ अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.