Good News : भारतीय अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार

BREAKING NEWS:
The 2019 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer “for their experimental approach to alleviating global poverty.”#NobelPrize pic.twitter.com/SuJfPoRe2N— The Nobel Prize (@NobelPrize) October 14, 2019
अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्यानंतर अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पूर्वी अर्थशास्त्रातला नोबेल देऊन अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.
याशिवाय रविंद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानासाठी, सी. व्ही. रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदानासाठी, मदर तेरेसा यांना शांततेचा, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी, कैलाश सत्यर्थी यांना शांततेचा तर आता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.
नोबेल पुरस्कार हा जगातला सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार समजला जातो. आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो. आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजे १० डिसेंबर १९०१ पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, साहित्य आणि शांतता या विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
कोण आहेत अभिजित बॅनर्जी ?
अभिजीत बॅनर्जी हे सध्या मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आणि त्यांची पत्नी डफलो ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब’ चे को-फाउंडर आहेत. बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल ५० लाख मुलांना फायदा झाला आहे.
नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की या अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनातून गरीबीचं उच्चाटन करण्यात मदत मिळत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये त्यांच्या प्रयोगावर आधारित प्रयत्नांतून विकासात्मक अर्थशास्त्रात मोठे बदल घडून आले आहेत. यामुळे रिसर्चच्या क्षेत्रात नवी प्रगती झाली आहे.