Pune : बहुचर्चित शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त , खातेधारक हवालदिल

पीएमसी बँकेचे प्रकरण गाजत असतानाच पुण्यातील बहुचर्चित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आदेशानुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. आर्थिक अनियमितता आणि अन्य कारणांमुळे या बँकेवर ‘आरबीआय’ने निर्बंध लावले होते. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी याबाबतचे आदेश काढले असून, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आघाव यांनी या पदाचा कार्यभार गुरुवारी घेतला.
या बँकेची ‘आरबीआय’ने २६ एप्रिल २०१९ रोजी विशेष तपासणी केली. त्यात कामकाजात अनियमितता आढळून आली होती. त्यानुसार ‘आरबीआय’ने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासक नेमण्याचे आदेश सात ऑक्टोबरला दिले होते. त्यानुसार सहकार आयुक्त सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबतचा आदेश बुधवारी काढला; तसेच आघाव यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.
या बँकेवर निर्बंध लावल्यानंतर ठेवीदार आणि खातेदारांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. खातेदारांना एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येत नाही. आता संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे या बँकेचा कारभार प्रशासकांकडून पाहिला जाणार आहे.
या बँकेच्या सुमारे ४३० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. कर्जवाटप सुमारे ३१० कोटी रुपयांचे करण्यात आले आहे. अनुत्पादित कर्जाची रक्कम सुमारे २९४ कोटी रुपये आहे. या बँकेच्या १४ शाखा असून, सुमारे १६ हजार खातेदार आहेत. बँकेने कर्जाची थकबाकी असलेल्या २७५ खातेदारांविरुद्ध वसुली आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे.