Pawar In Action : ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही !! पवारांची ऍक्शन भाजपला चांगलीच झोंबली, प्रतिस्पर्धी नाहीत मग मोदी-शहांच्या सभा का घेताय ?

आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. “आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवानांशी होते ” अशांशी “नाही.”, असे ‘इन ऍक्शन ‘प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने त्याचे हे हातवारे भाजपला चांगलेच झोम्बले आहेत.
बार्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत पवार यांनी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रात निवडणुकीसाठी विरोधकच नाहीत. मग देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येत आहेत? मी ५० वर्षात काय केलं असा प्रश्न विचारण्याआधी तुमच्यापैकी ‘एक माय का लाल’ दाखवून द्या, जो सलग १४ वेळा निवणुक जिंकला असेल”, असे आव्हान देखील पवार यांनी भाजपला दिले.
भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून ‘इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसाने असे करणे शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीनं ते अधिकच बिथरले आहेत,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतानाच शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले दिलीप सोपल यांच्यावरही टीका केली. बार्शीचा विकास करण्यासाठी पक्षांतर केले मग इतकी वर्ष काय करत होतात? असा प्रश्न विचारत असताना पवारांनी आक्षेपार्ह हातवारे केले. “काही लोक विकासाचे नाव सांगून आपल्याला सोडून गेले. बार्शीकर अशा पळकुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.”, असेही पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. कर्जमाफी दिली असती तर राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. मुख्यमंत्री शेतकरी समाजाला लहान पोरंटोरं समजू लागले आहेत. फक्त मोठा आकडा दाखवून शेतकरी समाजाला फसवण्याचे काम केले जात असल्याचेही पवार म्हणाले.
शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेचा समाचार देखील पवार यांनी घेतला. “दहा रुपयांत जेवण राज्यात कुठे आणि किती ठिकाणी देणार? तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय? अन्नधान्याचा प्रश्न आहे पण त्यासोबतच इतर प्रश्न देखील राज्यात आहेत.” अशी टीका पवारांनी केली.
सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी इथं झालेल्या जाहीर सभेत आज शरद पवारांचे भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना पवारांनी लक्ष्य केले. ‘विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं. त्या अनुषंगानं बोलताना पवार म्हणाले, ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही.’ हे वाक्य बोलताना पवार यांनी विशिष्ट प्रकारे हातवारे केले. पवारांच्या भाषणाचं चित्रण करणाऱ्या टीव्ही कॅमेऱ्यांनी ते हातवारे टिपले. काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आलं.