मोदींना निवेदन दिल्याने वर्ध्यातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठाने केले निलंबन

देशातील मॉब लिंचिंग घटनेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले म्हणून ५० जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला असताना आता देशातील सध्याची स्थिती व काश्मीर प्रश्नावर मोदी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्धामधील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असा खुलासा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंदन सरोज (एम. फील, सोशल वर्क), नीरज कुमार (पीएचडी अँड पीस स्टडीज), राजेश सारथी आणि रजनीश आंबेडकर (वुमेन स्टडी), पंकज वेला (एम. फिल), वैभव पिंपळकर (डिप्लोमा, वुमेन्स स्टडीज डिपार्टमेंट) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व निलंबित विद्यार्थी हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील स्त्री अध्ययन विभागातील आहेत. विद्यापीठ परिसरात बसपाचे संस्थापक कांशीराम यांची जयंती साजरी करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. परंतु, विद्यापीठाने ती नाकारली. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. त्यानंतर विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे पंतप्रधानांना पत्र लिहिले. विद्यापीठात सर्व कार्यक्रमांना परवानगी मिळते. मग कांशीराम यांच्या जयंतीसाठी परवानगी का नाकारण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.
विद्यार्थ्यांनी आंदोलन केले म्हणून विद्यापीठाने सहा विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचे विद्यापीठ संकेतस्थळावरून सांगितले. विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचीव डॉ. राजेश्वर सिंह यांनी ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन तसेच न्यायलयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे. ही कारवाई बेकायदेशीर आहे. विद्यमान स्थितीवर चिंता व्यक्त करीत पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची बाब गुन्हा ठरू शकत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने कार्यक्रमास परवानगी मागितली. पण नाममात्र कारण देत परवानगी नाकारल्याची बाब अन्यायकारकच आहे, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.