शिवसेना बंडखोरांवर चंद्रकांत पाटील भडकले, ‘आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भाजपकडे काम घेऊन येऊ नका’, १४ बंडखोरांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक नाराज झाले. या इच्छुकांनी थेट बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे अनेक मतदारसंघात भाजप आणि सेनेची डोकेदुखी वाढली आहे. कारण बंडखोरांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर्वी हकालपट्टी केले चार मिळून तब्बल १४ बंडखोरांचा पक्षातून हकालपट्टी केली आहे.
‘आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूनच रोष पत्करुन आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही’, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली. संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील चांगलेच भडकले आहेत. ‘आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भाजपकडे काम घेऊन येऊ नका’, असे पाटील यांनी मंडलिक यांना सुनावले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली तरीही दोन्ही पक्षांमधील धुसफस काही केल्या कमी होताना दिसत नाही. चंद्रपूर वगळता प्रत्येक जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरवर पाहता युती झालेली दिसत असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळली नसल्याचे पाहायला मिळत नाही. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे. या मतदारसंघात भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युती धर्म पाळला नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मांडलिक यांना खडेबोल सुनावले आहे.
अनेक मतदारसंघात भाजप आणि सेनेच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला खुलं आव्हान दिलं आहे. काही ठिकाणी तर अपक्ष उभा राहिलेल्या उमेदवाराच्या मागे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकद उभी केली आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवाराची अडचण झाली आहे. म्हणूनच चंद्रकात पाटील यांनी आतापर्यंत 14 जणांना पक्षातून काढून टाकलं आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. ही जागा युतीत भाजपच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेनं या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला AB फॉर्म देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे.