वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची फोडणी , भाजप महाराष्ट्राचे विभाजन करण्याच्या मनस्थितीत

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, असं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठांवरून सांगितलं आहे. २०१४ साली सत्ता येण्याआधी याबाबतचं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील जनमत लक्षात घेता भाजपने हा मुद्दा मागे सोडलेला दिसत आहे. मात्र अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय खुलासा करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ करू. कारण राज्यासह केंद्रातही आमची सत्ता आहे. असं आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खासगीत बोलताना सांगितलं होतं,’ असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांना वेगळा विदर्भ करायचा होता, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा जसजसा एक-एक महिना पुढे जात राहिला तसं त्यांना वाटत गेलं की आपण आता अख्ख्या महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री राहू शकतो. त्यामुळे त्यांचा तो विचार मागे पडला,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.