Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सत्तेसाठी नव्हे , सबळ विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करा , राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन, गोरेगावच्या सभेत सेना -भाजपवर टीकास्त्र

Spread the love

महाराष्ट्राला आज सक्षम, प्रबळ आणि कोणासमोरही घरंगळत न जाणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असून ती संधी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनसेच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेतून महाराष्ट्रातील जनतेला केले. दरम्यान गोरेगाव येथी सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा बुधवारी पुण्यात होणार होती. ती सभा पावसामुळे रद्द करावी लागल्यानंतर मुंबईत सांताक्रुझ येथे आज झालेली सभा शुभारंभाची सभा ठरली. या सभेत अवघ्या १५ मिनिटांच्या भाषणात राज यांनी राज्यात सत्ता नव्हे तर विरोधी पक्षाचं स्थान मिळेल इतकं बळ मनसेला देण्याचे आवाहन मतदारांना केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तो दाखला देत, आज सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. म्हणूनच मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. येत्या १० दिवसांत माझ्या १८ ते १९ सभा होणार आहेत. या प्रत्येक सभेत मी ही एकच मागणी करणार आहे, असे राज यांनी सांगितले.

माझा आवाका मला माहीत आहे. त्यामुळे आताच मला सत्ता हवी, असे मी म्हणणार नाही. विरोधी पक्षासाठी मतदान करा, अशी भूमिका मांडणारा मनसे हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील पहिल पक्ष असेल, असेही राज यावेळी म्हणाले. सत्ता आवाक्यात असेल तेव्ही ते मागणं घेऊन मी नक्कीच तुमच्यापर्यंत येईन. तूर्त मनसेला एक प्रबळ विरोधी पक्ष होण्यासाठी बळ द्या. मी दिलेल्या प्रत्येक उमेदवारात सरकारला जाब विचारेल इतकी आग आहे. तुमचे प्रश्न खंबीरपणे विचारू शकेल इतकी धमक आहे. मनसेचा विरोधी पक्षनेता झाला तर नक्कीच तो या सरकारला नामोहरम करेल, असा विश्वास राज यांनी बोलून दाखवला.

ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. शहरांचा आज पार विचका झाला आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने बुधवारी पुणे विस्कळीत झाले. मी पुण्यात नाही पाण्यात राहतो, असे सांगण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. या सगळ्याला सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात राज यांनी केला. पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतंय, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

दरम्यान गोरेगावातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले कि , शिवसेना युतीत सडली आणि १२४ वर आली; शिवसेना फक्त राजीनामा देण्याची घोषणा करते, करत तर काहीच नाही. खरे तर  महाराष्ट्राची ज्वलंत परंपरा, ‘अरेला का रे’ करण्याची क्षमता आहे. या न्यायाने मनसेचे उमेदवार तुमचा राग विधानसभेत व्यक्त करतील. भाजपवर टीकास्त्र सोडताना टे म्हणाले कि , बुलेट ट्रेन कशासाठी ? मुंबईची लोकल सेवा सुधारण्याकडे लक्ष नाही. काश्मीरचे कलम ३७० हटवले अभिनंदन; पण त्याचा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय? एकाच ठिकाणी सर्वाधिक बिबटे आढळणारे जगातील एकमेव ठिकाण म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.  मेट्रो कारशेड कुलाब्यात का नाही ? आरेची झाडे का तोडताय ?

जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्याला प्रबळ विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. सताधाऱ्यांच्या भूलथापांबद्दल तुमच्या मनात राग आहे की नाही असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले कि,  सगळी शहरे कोलमडून पडली आहेत. रोजगाराच्या मुद्यावर जनतेत चिंतेचे वातावरण आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजप-शिवसेनेतून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राला भूगोलही आहे आणि इतिहासही आहे, गड किल्ले भाड्यावर कसे काय देता? ज्यांना ईडीच्या नोटीसा आल्या त्यांनी भाजपात प्रवेश केला. ईडीची नोटीस आली तरी मी गप्प बसणार नाही.  ईडी चौकशीनंतर मी स्पष्ट सांगितले होते, मी बोलणं थांबवणार नाही.  विकासाची ब्लू प्रिंटऐवजी ब्लू फिल्म काढली असती तर लोकांनी पाहिली तरी असती; राज यांचा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला. २०१४ च्या निवडणुकीत विकास आरखडा मांडणारा मनसे हा देशातील पहिला राजकीय पक्ष पण ही भाषा लोकांना समजली नही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!