Pune Crime : पत्नीशी अश्लील बोलल्याच्या कारणावरून मित्राची अपहरण करून हत्या , दोघांना अटक

पत्नीशी अश्लील भाषेत बोलल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. रोहित किसन कांबळे (वय १९) असे मयत युवकाचे नाव आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुण्यातील संगमवाडी येथील नदीत आरोपींनी फेकून दिला. या प्रकरणी आरोपी आकाश साळवे (वय २५) आणि इलियाज शेख (वय २१) यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
मयत रोहित किसन कांबळे याचे गुरुवारी अपहरण झाले होते. या प्रकरणी मयत रोहितच्या आईने वाकड पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार वाकड पोलीस रोहितचा शोध घेत होते. दरम्यान, आज पुण्यातील संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह मिळाला. या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर मित्रानेच खून केल्याचं उघड झाले आहे. मयत रोहित, आरोपी आकाश आणि इलियाज हे तिघे मित्र असून, वाकड ते काळेवाडी फाटा येथे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत. मयत रोहित हा आकाशच्या पत्नीला अश्लील बोलला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद ही झाला होता. मात्र, आकाशला झालेली घटना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने मित्र इलियाजच्या साथीने रोहितचे अपहरण करून खूनाचा कट रचला.
कटाप्रमाणे गुरुवारी त्याच्याच रिक्षातून रोहितला लोणावळा येथे फिरण्यासाठी जाऊ असे म्हणून दोघांनी तळेगाव परिसरातील भेगडेवाडी येथे नेण्यात आले. तिथे दोघांमध्ये भांडण झाले, यातून आकाशने साथीदार इलियाजच्या मदतीने रोहितचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रिक्षातून रोहितचा मृतदेह पुण्यातील संगमवाडी परिसरात बेवारस फेकून दिला. वाकडचे सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने यांनी अवघ्या काही तासातच मुख्य आरोपींना गजाआड केलं.