Maharashtra Vidhansabha 2019 : आचारसंहितेच्या छापेमारीत ४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारु, १५ कोटी २९ लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिने असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, राज्यात विविध कलमांखाली ४४२ प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय दंड विधान अंतर्गत विविध कलमांखाली १०२, लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाखाली १५, अंमली पदार्थ विषयक एनपीडीएस अधिनियमांतर्गत ७२, मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत २२८ तर मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत २५ प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
राज्यात मतदार नोंदणी तसेच मतदार यादी अचूक होण्याच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रारूप मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या मतदार याद्यातील त्रुटी दाखवून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मदत करण्यास राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार एक लाख १० हजार बीएलए नेमण्यात आले होते. या बीएलएच्या साहाय्याने मतदार यादी जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना यावेळी दिली.