भाजप- शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती : मल्लिकार्जुन खर्गे

भाजप शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार असल्याचे सांगत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिवसेना भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अद्यावत वॉर रूमचे उद्घाटन आज रविवारी खर्गे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली अद्यावत वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मिडीयावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहे,” असं खर्गे यावेळी म्हणाले.
“सरकारने पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणाऱ्या मुंबईकरांना, तरूण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे. डिस्कव्हरी चॅनलच्या मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता. पण आजीने वृक्षामध्ये जीव असतो लाकडाचा व्यवसाय करू नको, असे सांगितले होते. याची आठवण करून देत आपण पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत हे पंतप्रधानांनी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना सांगावे,” असे खर्गे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोहचणे आणि प्रचाराचे समन्वय साधण्याचे काम केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मिडीया आणि इतर माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक जोरदार पध्दतीने प्रचार अभियान राबवेल असेही ते म्हणाले.