मयत भिकाऱ्याकडे मिळाली १२ गोण्या भरून चिल्लर आणि बँक खात्यात निघाले २० ते २५ लाख रुपये

आजकाल कोणाकडे किती पैसा सापडेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका व्यक्तीचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचं पोस्टामध्ये खातं असल्याचं समोर आलं होतं. तसंच त्या खात्यात काही रक्कमही असल्याचं निदर्शनास आलं होतं. असाच काहीसा प्रकार मुंबईतील गोवंडी परिसरात घडला आहे. भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १२ गोणी भरून चिल्लर सापडली आहेत. ही रक्कम चार ते पाच लाखांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे.
गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भीक मागून आपला उदनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीचा ४ ऑक्टोबर रोजी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. त्याच्या घरात पोलिसांना १२ गोणी भरून चिल्लर सापडली असून ती रक्कम चार ते पाच लाखांच्या घरात असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. तसंच पोलिसांच्या तपासात त्या व्यक्तीची बँकांमध्येही खाती असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमध्ये तब्बल २० ते २५ लाखांची रक्कम जमा असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.