महाराष्ट्र : उद्यापासून आठवडाभर मराठवाडा, खान्देश , विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज , वीज कोसळून तीन ठार , दोन जखमी

उद्या ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखे पर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपार नंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
वीज कोसळून तीन ठार , दोन जखमी
जालना तालुक्यातील भागडे सावरगाव या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोनदेव या गावात वीज कोसळून दोन महिला जखमी झाल्या आहेत. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच सेवली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्थिव शवविच्छेदनासाठी सेवली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सेवलीचे सपोनि. विलास मोरे यांनी दिली आहे.
आज सकाळपासून जालना तालुक्यासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोराचा पाऊस पडत होता. सुमनबाई साहेबराव नाईकनवरे राहणार भागडे सावरगाव यांच्या शेतातील सोयाबीन पिक काढण्याचे काम सुरू होते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे आकाशात ढगांची दाटीवाटी झाली आणि पावसाची एक जोरदार सर आली त्यामुळे सोयाबीन काढणारे काही मजूर शेतातील एका झाडाखाली बसले होते कळण्याच्या आत याच झाडावर वीज कोसळली. भागडे सावरगाव आणि सेवलीमधील तीन पुरुष व्यक्तीवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. भागडे सावरगावमधील गयाबाई गजानन नाईकनवरे (वय ३५), सेवली येथील संदीप शंकर पवार (वय ३०), आणि मंदाबाई नागोराव चाफळे (वय ३५) या तिघांचा यात मृत्यू झाला आहे. तर सुमनाबाई साहेबराव नाईकनवरे (भागडे सावरगाव), सुनील संदीप पवार (सेवली), सचिन नागोराव चाफळे (सेवली) हे तिघे जण जखमी झाले आहेत.
परतीच्या पावसाने नाशिकला पुन्हा झोडपले , जनजीवन विस्कळीत , कार गेली वाहून