महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदींच्या ९ अमित शहांच्या २० आणि मुख्यमंत्र्यांच्या १०० धडाकेबाज प्रचार सभांचे भाजपकडून नियोजन

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत संपताच सोमवारपासून सुरू होणार आहे. प्रचारात वरचष्मा राहावा म्हणून भाजपने प्रचाराची खास योजना तयार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते राज्यात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. भाजपच्या असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरणार असून साताऱ्यात होत असलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासाठी ते पहिली सभा घेणार आहेत. त्यानंतर राज्यात ते सलग तीन दिवस सभा घेतील असे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुकही होत आहे. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष आहे . त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा उदयनराजे यांच्यासाठी होत असल्याचे वृत्त आहे. राज्यात पंतप्रधान मोदींच्या ९ सभांचे आयोजन भाजपने केले आहे.
विधानसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आपली प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला असा दावा भाजपने केलाआहे मात्र आता खरी प्रचाराची लढाई सुरू होणार असून भाजपने प्रचाराचा ‘मेगा प्लान’ तयार केला आहे. गेल्या नेक निवडणुकांपासून प्रचारात भाजपची कायम आघाडी असते. त्यानुसार याही वेळी भाजपने सर्वच साधनांचा वापर करून प्रभावी प्रचारतंत्र वापरण्याचे ठरविले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या २० सभा होणार आहेत. राज्याच्या कुठल्या भागात या सभा घ्यायच्या याचं नियोजन भाजपचे ज्येष्ठ नेते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रचारातले प्रमुख स्टार प्रचारक आहेत. डिजीटल आणि सोशल मीडियाचा अतिशय प्रभाविपणे वापर करण्याचं भाजपने नियोजन केले असल्याने प्रचार जोरदार रंगण्याची शक्यता आहे.
मोई आणि अमित शहा यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जवळपास १०० सभांचे आयोजन केले आहे. भाजप-सेना महायुतीच्या प्रचाराची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील संयुक्त सभेने होणार होणार आहे. राज्यात भाजपच्या प्रचारासाठी देशभरातून नेते मंडळीही येणार आहेत. यात जे पी नड्डा, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, गौतम गंभीर, प्रकाश जावडेकर, राजवर्धन राठोड या नेत्यांचाही समावेश असणार आहे.