उद्धव ठाकरे यांनी घेतला भाजपाला मार्मिक चिमटा , म्हणाले , ” मित्रपक्षाला कोणती जागा दाखवायची म्हणजे द्यायची तो त्यांचा प्रश्न !!”

‘युतीचं जागावाटप झालं आहे. आता भाजपनं त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांचं काय करायचं आहे आणि मित्रपक्षाला कोणती जागा दाखवायची म्हणजे द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे,’ असा मार्मिक चिमटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपाला काढला. भाजप-शिवसेना युतीमध्ये १६४:१२४ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपला मिळालेल्या १६४ जागांमधूनच मित्रपक्षांना १४ जागा देण्यात आल्या आहेत. तर, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार आहेत.
शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये मित्रपक्षांना द्यावयाच्या जागेचाही एक तिढा होता. मित्रपक्षांना द्यावयाच्या १८ जागा दोन्ही पक्षाच्या कोट्यातून निम्म्या निम्म्या द्यायच्या, असा एक फॉर्म्युला होता. मात्र, २०१४ साली महायुतीतील मित्र पक्ष भाजपसोबत होते. त्यामुळं शिवसेनेने आपल्या कोट्यातून त्यांना जागा देण्यास ठाम नकार दिला होता. अखेर भाजपलाच त्यांची जबाबदारी उचलावी लागली. मात्र, भाजपने १८ ऐवजी १४ जागा मित्रपक्षांना दिल्या. विशेष म्हणजे मित्रपक्षातील अनेक उमेदवार भाजपच्याच कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जागाही भाजपच्याच खात्यावर जाणार हे उघड आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी याबाबत विचारलं असता उद्धव यांनी सूचक वक्तव्य केलं. ‘शिवसेनेनं ठरल्यानुसार भाजपला जागा सोडल्या आहेत. त्यानंतर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपनं मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवली असेल, म्हणजे त्यांना अपेक्षित जागा दिल्या असतील, नसतील तर त्यावर मी काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.