महाराष्ट्र विधानसभा २०१९ : वादग्रस्त , बहुचर्चित श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून बसपाची उमेदवारी

अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हे अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. श्रीपाद छिंदम हे भाजपकडून नगरचे उपमहापौर झाले होते. उपमहापौर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले होते. त्याची राज्यभर चर्चा आणि वाद झाला होता. याच वादामुळे त्यांना उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर छिंदम पुन्हा अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी नगरमधून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. ते आता बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. छिंदम यांना नगरसोडून दुसऱ्या जिल्ह्यातली आश्रय घ्यावा लागला होता. मात्र त्यानंतर त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.
श्रीपाद छिंदम हे वॉर्ड क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवार होते. त्यांनी २००० मतांनी त्यांचा गड जिंकला होता. खरंतर त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे जनतेने त्यांच्यवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र अशी चर्चा कुठेतरी होती. पण या सगळ्यावर मात करत लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
छिंदम हे त्या वेळी भाजपचे उपमहापौर होते. श्रीपाद छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. तसंच संबंधीत कर्मचाऱ्याने त्यांच्याविरुद्ध युनियनकडे तक्रारही केली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेनं छिंदम यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केली होती. शिवसेनेसोबतच संभाजी ब्रिगेडही छिंदम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने भाजपने शहरातलं वातावरण चिघळू नये, यासाठी छिंदम यांची तात्काळ उममहापौरपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. छिंदम यांनी त्याबद्दल माफिही मागितली होती.
दरम्यान, या ऑडिओ क्लिपनंतर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेधही केला होता.