Maharashtra Vidhansabha 2019 : एबी फॉर्मच्या घोळामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज झाला बाद

चिंचवड विधानसभा मतदान संघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कारण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. पक्षाचा अधिकृत AB फार्म नसल्याने आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत झाला बाद आहे.
या मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतून भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधातील मोठा स्पर्धक या प्रकारामुळे बाद झाला आहे.
एकीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागली. अनेक दिवसांच्या घोळानंतर चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांच्या अर्जासोबत पक्षाचा AB फॉर्म नसल्याने हा अर्ज बाद करण्यात आला.
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतरही युतीत जागावाटपावरून संघर्ष झाला. तर आघाडीतही काही जागांवर बिघाडी झाल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच पिंपरी शहरातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ‘पिंपरी शहरातील तीन पैकी एक मतदारसंघ आम्हाला द्या, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच करणार नाही,’ अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे इथं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आचारसंहिता जाहीर ह्योण्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरीतील जागांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर मेळाव्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचं सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले.
दुसरीकडे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे हे आता राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार ठरण्याची चिन्हं आहेत. राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षांकडून अशी अपेक्षा नव्हती, कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देत पुढील राजकीय वाटचाल कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवणार, असं प्रशांत शितोळे म्हणाले.