Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ५ हजार रुपये मासिक भत्ता, नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवकांना ८० टक्के आरक्षण, काँग्रेसचा जाहीरनामा

Spread the love

महाराष्ट्रातील युवकांसाठी युवक काँग्रेसने ‘महाराष्ट्र ४.०’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ५ हजार रुपये मासिक भत्ता देण्याचे तसेच नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवकांना ८० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘वेक अप महाराष्ट्र’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. यात राज्यातील सुमारे ३ कोटी युवकांनी सहभाग घेतला. त्यात हजारो युवकांनी यात बहुमूल्य सूचना दिल्या. या सर्व सूचनांवर चर्चा करून प्रभावी असा युवक जाहीरनामा बनवण्यात आला असून खास युवकांसाठी बनविलेला देशातील हा पहिलाच जाहीरनामा आहे, असा दावा तांबे यांनी केला. हा जाहीरनामा विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आला आहे. आमचे सरकार आल्यानंतर जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आराखडा देखील आमच्याकडे तयार आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.

जाहीरनाम्यातील आश्वासने:

रोजगार :

> सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देणार.

> महापरीक्षा पोर्टल तत्काळ बंद करणार.

> १ लाख ९१ हजार रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या १८० दिवसांत पूर्ण करणार.

> स्थानिक युवकांना (भूमिपुत्र) खासगी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्यासाठीचा कायदा करणार.

शिक्षण :

> ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्जे माफ करणार.

> प्रमुख शहरांत युवकांसाठी वसतिगृहांची संख्या वाढवणार.

> सर्व दिव्यांग युवकांसाठी विनामूल्य उच्च शिक्षणाची हमी

> गुणवान विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

> शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकार बँक हमी देणार

सशक्तीकरण:

> स्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन करणार.

> जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विकसित करणार.

> स्टार्ट-अप साठी ५०० कोटी रुपये आणि कृषी आधारित व्यवसायांसाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांचे भाग भांडवल उभे करणार.

आरोग्य आणि अन्य :

> महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी.

> पदवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा.

> शालेय अभ्यासक्रमात ‘जीवनशैली व्यवस्थापन’ आणि ‘नागरिकशास्त्र’ अनिवार्य करणार.

> सायबर सुरक्षेचे धडे अनिवार्य करणार.

> महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा असलेल्या सर्व गड किल्ल्यांची दुरुस्ती करून पर्यटनाला चालना देणार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!