कोथरूड विधानसभा : ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांना घेरले , उद्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

कोथरुडमधून विधानसभा लढविणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी अजूनही सुरुच आहेत. भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे बंड शमले असला तरी ब्राम्हण महासंघांचा चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला विरोध कायम आहे. ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांनी चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच ब्राम्हण समाजाच्यावतीने तीन अटीही ठेवल्या आहेत. उद्या या सर्व मुद्यांवर ब्राह्मण महासंघाची बैठक होत आहे.
ब्राम्हण महासंघाने चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मयुरेश अरगडे यांना आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून ब्राम्हण महासंघाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्यास सुरुवातही केली आहे. ब्राम्हण महासंघाने चंद्रकांत पाटलांपुढे तीन मुख्य अटी ठेवल्या आहेत. यामध्ये परशुराम विकास महामंडळ तयार करावे, पौराहित्य करणाऱ्या पुरोहितांना मानधन दिले जावे, ब्राम्हण समाजाला अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे या अटींचा समावेश आहे.
दरम्यान ब्राम्हण महासंघाच्या या मागण्यांवर चंद्रकांत पाटलांनी सावध भूमिका घेतली असून निवडणूक झाल्यानंतर ब्राम्हण महासंघाच्या या मागण्यांवर विचार केला जाईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्यावर ब्राम्हण महासंघ उद्या रविवारी दुपारपर्यंत यावर निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या मुद्द्यावर आता ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही एक वाक्यता नसल्याचे दिसत आहे. एकिकडे महासंघाचे अध्यक्ष चंद्रकात पाटलांनीच माघार घ्यावी अशी भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे ब्राम्हण महासंघाचे इतर पदाधिकारी चंद्रकांत पाटलांच्या माघार घेण्याच्या मुद्द्यावर सारवासारव करत आहेत. यावरुन ब्राम्हण महासंघातही गट पडल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात उद्याच्या बैठकीत ब्राह्मण महासंघ काय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.