मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण पाटील यांचाही अर्ज वैध , आक्षेप फेटाळले

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. या हरकतीवर झालेल्या सुनावणीत विखेंचा अर्ज वैध ठरवल्याचा निर्णय शिर्डी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीवर शनिवारी तीन वाजता सुनावणी झाली. त्यानंतर विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी स्वतः आणि आपल्या प्रतिनिधी करवे तीन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली होती . ज्या वकिलाकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आले त्यांचा नोटरी करण्याचा परवाना २०१६ साली संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. याबाबत लेखी तक्रार शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती.