महाराष्ट्र विधानसभा २०१९ : ना बावनकुळे ना त्यांची पत्नी, भाजपने दिली सावरकरांना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेत तिकीट नाकारलेल्या उमेदवारांची भाजपने मोठी फजिती केली. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अखेरपर्यंत आपल्याला किंवा आपल्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशी अशा होती पण या महाशयांना भाजपनं जोरदार धक्का दिला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांचा पत्ता आता पूर्णतः साफ झाला असून त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान आपल्याला नाही तर आपल्या पत्नीला तरी उमेदवारी मिळेल अशी शक्यता गृहीत धरून त्यांनी आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज तडकाफडकी भरला होता परंतु हि उमेदवारी आता सावरकरांना गेल्यामुळे बावनकुळे यांचा विषय संपला आहे.
खरे तर पहिल्या यादीपासूनच भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत पक्षातील मोठ्या नेत्यांना घरी बसवण्याचा इरादा जाहीर केला होता यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा समावेश होता. बावनकुळेंचाही नंबर होता परंतु ज्या प्रमाणे खडसे यांच्या मुलीला तिकीट मिळाले तसे आपल्या पत्नीलाही मिळेल या आशेवर बावनकुळे होते त्यामुळे त्यांनी आपली पत्नी ज्योती बावनकुळे यांचा उमेदवारी दाखल करून टाकला त्यासाठी त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. त्यांच्या ऐवजी भाजपनं टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर सावरकर यांच्यानंतर पक्षाच्या दुसऱ्या फॉर्मवर अनिल निधान यांचे नाव आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरही बावनकुळे किंवा त्यांच्या पत्नीचे नाव नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
आता तिकीट मिळाले नाही हे सप्ष्ट झाल्याने ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला अर्ज त्या परत घेतात का ? हे पाहावे लागणार आहे.