महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजपाची चौथी यादी जाहीर , खडसेंच्या ऐवजी कन्या रोहिणीला उमेदवारी, तावडे , मेहता , राज पुरोहित वाऱ्यावर

महाराष्ट्र विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे. वेटिंगवर असलेल्या दिग्गजांपैकी भाजपनं केवळ एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपने आपल्या सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. नाराज नारायण खडसे यांच्या असंतोषाची दखल पक्षाने घेतली खरी पण त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईतील बोरीवली, कुलाबा व घाटकोपर पूर्व या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवे चेहरे देण्यात आले आहेत. बोरीवली येथून भाजपने सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे. एसआरए घोटाळ्यात नाव असलेल्या प्रकाश मेहता यांना डावलून घाटकोपर पूर्वमधून नगरसेवक पराग शहा यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. कुलाबा मतदारसंघातून पुरोहित यांच्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.
यादीतील उमेदवारांमध्ये बोरीवली – सुनील राणे, घाटकोपर पूर्व – पराग शाह, कुलाबा – राहुल नार्वेकर, तुमसर – प्रदीप पडोळे, मुक्ताईनगर – रोहिणी खडसे, काटोल – चरणसिंग ठाकूर, नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकले यांचा समावेश आहे.