सिने अभिनेत्री दीपाली सय्यद शिवसेनेत , जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने राष्ट्रवादीचा मुंब्रा-कळव्याचा गड ताब्यात घेण्यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना आव्हाडांविरोधात मैदानात उतरवण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतला आहे. दिपाली सय्यद यांनी आज रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दिपाली यांच्या हातावर शिवबंधन बांधून उद्धव यांनी दिपाली यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यानंतर लगेचच दिपाली यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. दिपाली सय्यद या उद्या, ४ सप्टेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.
दिपाली सय्यद यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नंतर दिपाली सय्यद शिवसंग्राम पक्षात गेल्या होत्या. नगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा-कळवा मतदारसंघात दबदबा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांचा पराभव केला होता. एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या तर भाजपचा उमेदवार चौथ्या स्थानी राहिला होता. मुस्लीमबहुल मुंब्रा भागातून आव्हाड यांनी निर्णायक मते मिळवली होती. हीच मते आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने दिपाली सय्यद यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. कळव्यात शिवसेनेचं वर्चस्व असून मुंब्रा भागातून सेलिब्रिटी दिपाली यांनी मते खेचून आणल्यास आव्हाड यांच्यासाठी ही निवडणूक जड जाऊ शकते असा सेनेचा अंदाज आहे.