लोकसभेपाठोपाठ नाना पटोले साकोलीमधून विधानसभेच्या रिंगणात

लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले आता विधानसभेच्याही रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून त्यांना भंडाऱ्यातील साकोलीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपाने पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उतरवले असल्याने, येथील लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसकडून काल रात्री उशीरा नाना पटोले यांच्या उमेदवारीचे पत्रक जारी करण्यात आले आहे. पटोले हे काँग्रेसचे नेते असून साकोली विधानसभा त्यांचे गृहक्षेत्र असल्याने या क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. शिवाय या अगोदर २००९ मध्ये साकोली मतदारसंघातुनच ते विधनासभेवर निवडून गेले होते. तर भाजपाचे उमेदवार डॉ.परिणय फुके यांना देखील मंत्रीपद मिळाल्यानंतर अल्पावधीतच भंडारा-गोंदिया ही जिल्हे पिंजून काढून येथील जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमधील लढत ही चुरशीची होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.