महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मित्रपक्षाविना मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी केले महायुतीवर शिक्कामोर्तब !!

दोन्हीही पक्ष आणि मित्र पक्षातील जागावाटप झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली.मित्रपक्षांच्या नेत्यांची मात्र या पत्रकार परिषदेला उपस्थिती नव्हती हे विशेष.
यावेळी पत्रकारांसमोर युतीची घोषणा करताना , गेली ५ वर्षे आम्ही राज्याला गती दिली. बरेच प्रश्न मार्गी लागलेत आणि अजूनही खूप प्रश्न बाकी आहेत. त्यावर पुढील पाच वर्षांत जास्तीत जास्त भर देणार आहोत. दुष्काळी भागावर आमचा फोकस असणार आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असून वाहून जाणारं पावसाचं सर्व पाणी साठवून दुष्काळी भागाला देऊ व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘महाराष्ट्राच्या मनातली महायुती मैदानात उतरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल. कुणी अतिशयोक्ती म्हणेल पण महाराष्ट्रात कधीच कुणाला प्रतिसाद मिळाला नाही इतका प्रतिसाद या निवडणुकीत महायुतीला मिळेल’, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
हिंदुत्वाचा धागा भाजप आणि शिवसेनेला जोडणारा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी तमाम जनतेची अपेक्षा होती आणि त्यानुसारच आमची युती झाली आहे, असे सांगताना महायुतीत सगळ्यांनाच काही प्रमाणात कॉम्प्रमाइज करावं लागलं आहे. युतीसाठी ते करावंच लागतं, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान राज्यातील बंडखोरीच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत सगळ्या बंडखोरांना माघार घ्यायला लावणार आहोत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकतील व बंडखोरी राहणार नाही, असे आम्हाला वाटते. त्याउपरही बंडखोरी राहिल्यास त्याला युतीत स्थान नसेल. त्याला त्याची जागा महायुती दाखवेल.
एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कापत तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्याबाबत विचारलं असता याला तिकीट कापलं असं म्हणता येणार नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यांची जबाबदारी आता बदलली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महायुतीत शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या आहेत. शिवाय भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या दोन जागा शिवसेनेला मिळणार आहेत. अन्य घटकपक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या आहेत आणि उरलेल्या १५० जागा भाजप लढत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत दिसणार आहेत. त्यांचं मी स्वागत करत आहे, असे नमूद करताना आदित्य हे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आदित्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एक तरुण नेतृत्व पुढे येत असल्याचा निश्चितच आनंद आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आदित्य यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न असल्याबद्दल विचारलं असता त्याची तुम्हाला इतकी घाई का, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
आमची युती मनापासून , कणकवलीत मार्ग काढू : उद्धव ठाकरे
आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्याची शिवसैनिकांची इच्छा, युतीत शिवसेनेला मिळालेल्या निम्म्यापेक्षा कमी जागा याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता ‘तुझं माझं करत राहण्यापेक्षा आम्ही महाराष्ट्राचा विचार करून युती केली आहे’, असे सांगत त्यांनी सारवासारव केली. आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं. मनापासून युती झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपापसात बसून ठरवता येतात. दोन्ही पक्ष समजूतदार आहेत. त्यामुळे लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याचा विचार करत बसण्यापेक्षा दोन्ही भाऊ एकत्र पुढे चालले आहेत. आमच्यात ज्या गोष्टी ठरल्यात त्या मी येथे उगाळत बसणार नाही, असे उद्धव म्हणाले. आदित्यचं सक्रिय राजकारणातील हे पहिलं पाऊल आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं त्याचं स्वप्न आहे, इतकंच मी येथे सांगेन, असेही उद्धव यांनी पुढे नमूद केले. कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर बोट ठेवून कणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने उभी ठाकली आहे, असे विचारले असता तिथे आम्ही आमनेसामने असलो तरी येथे बाजूबाजूला बसलो आहेत. त्यामुळे त्याची चिंता नसावी. त्यावर आम्ही तोडगा काढू, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.