महाराष्ट्र विधानसभा २०१९ : गेवराई मतदार संघात बदामराव पंडित यांचा बंडाचा झेंडा

गेवराई शिवसेनेचे बडे नेते माजी मंत्री बदामराव पंडित यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. बदामराव पंडित यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून गुरूवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गेवराई शहरातील निघालेल्या रॅलीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपची जागा धोक्यात आल्याचा दावा करत ‘मातोश्री’चा आशीर्वाद घेऊन लढण्याचा निर्धार केल्याचे बदामराव पंडित यांनी यावेळी सांगितले.
‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेवून ‘साहेब मला माफ करा, मला माझं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवावीच लागेल. गुलाल घेऊनच परत तुमच्याकडे येईल, आज मला फक्त आशिर्वाद द्या. त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय’, अशी ठाम भूमिका बदामराव पंडित यांनी शिवसेना पक्ष प्रमुखासमोर घेतली. विद्यमान आमदार लक्ष्मण पवार (भाजप), विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी), बदामराव पंडित (अपक्ष), विष्णू देवकते (वंचित बहुजन आघाडी) यांच्यात हि लढत होत आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघातून शिवेसनेकडून बदामराव पंडित यांनी उमेदवारी मागीतली होती. मात्र, पंडित यांना उमेदवारी नाकारुन ही जागा भाजपला सोडण्यात आली. येथे भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार निवडणूक लढविणार आहेत. बदामराव पंडित यांनी तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी चार जिल्हा परिषद जागाही मिळवल्या होत्या. गेवराई मतदारसंघाचे त्यांनी 3 वेळा प्रतिनिधीत्त्व केले आहे. पूर्वी 1995 ला अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती. त्यावेळी विजय मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पुनरावृत्ती करणार का? अशी चर्चा सुरु आहे.