जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आदित्य ठाकरे यांची वरळीतून उमेदवारी दाखल , शपथपत्रावर नमूद केली संपत्ती

बहुचर्चित ठाकरे परिवारातील पहिले उमेदवार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बहुसंख्य शिवसैनिकांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची उपस्थिती होती. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक ठेवी १० कोटी ३६ लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरेंनी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपली एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख असल्याचे म्हटले आहे. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक करण्यात आली असून आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्यू गाडी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या गाडीची एकूण किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. आदित्य यांनी आपल्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे आदित्य यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीतून पदयात्रेला काढली. या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदित्य ठाकरे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. दरम्यान आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे.