महाराष्ट्र विधानसभा २०१९ : अमित शहा यांच्या उपस्थितीत फायनल होतेय भाजपची उमेदवार यादी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी युद्ध पातळीवर चालू असून पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचे वृत्त आहे . दुपारी १ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक, आदी नेते उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये जवळपास ११२ उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पुन्हा एक बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भाजप उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्याबरोबरच ‘युती’च्या जागावाटपाच्या चर्चेच्या प्रगतीबाबतही या बैठकीत चर्चा झाली झाली असल्याचे सांगण्यात येत आहे . युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात असून शेवटच्या काही जागांवर शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात या वाटाघाटी सुरू आहेत आणि लवकरच तोडगा निघण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.
मिळालेल्या माहिती नुसार या बैठकीत भाजपच्या प्रचाराचा मास्टर प्लानही ठरवला जाणार आहे. प्रचाराचे मुद्दे, विरोधकांवर करण्याचा हल्लाबोल आणि इतर व्ह्युरचनेवर या बैठकीत आराखडा तयार केला जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे . शेवटच्या ११ जगांचा प्रश्नं काही प्रमाणात सुटून तो आता फक्तं ५जागांच्या तडजोडीवर आलाय. आता ५ विधानसभा मतदारसंघातील तीढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या अंतीम चर्चेतून सोडवला जाणार आहे.
युतीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांनी युती तूटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतल्यामुळे युती अभेद्य रहाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे अनेक मतदार संघात तिकीट नेमके कुणाला द्यायचे याचे आव्हान दोन्हीही पक्ष नेतृत्वावर समोर असले तरी पक्षीय हित लक्षात घेता कोणीही तुटेपर्यंत ताणणार नाही असे दोन्हीही पक्षांनी ठरविल्यामुळे युती तुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे.