नाशिक जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस , जनजीवन विस्कळीत , रेल्वे वाहतूक झाली ठप्प !!

नाशिक शहर आणि जिल्ह्यात इगतपुरी ,सिन्नर, त्रंबकेश्वर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई ते नाशिक दरम्यानच्या रेल्वे रुळावर पाणीच पाणी झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ७.५० पर्यंत पावसाने येवला परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला. येवल्यात विजांचा प्रचंड कडकडाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर सातपूर येथील महिंद्र सर्कलजवळ एक कामगार नाल्यात वाहून गेल्याचं वृत्त आहे.
नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावत संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकच्या अनेक भागात पाणी साचले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे येथील दुतोंड्या मारुती मंदिर पाण्याखाली अर्धे गेले असून बुधवारचा आठवडी बाजारही वाहून गेला आहे. घराघरात पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच गोदावरी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान अस्वली, पाडली आणि घोटी स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने लोकमान्य टिळक टर्मिनस- मनमाड गोदावरी एक्स्प्रेस घोटीस्टेशनवर अडकून पडली असल्याचे वृत्त आहे. एक तासापासून गोदावरी एक्स्प्रेस उभी असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नागपूरहून येणाऱ्या गाड्या चाळीसगाव, नाशिक, इगतपुरीला थांबवण्यात आल्या आहेत तर मुंबईकडून जाणाऱ्या गाड्या ठाणे, कल्याणजवळ खोळंबल्या आहेत. पावसाचा जोर आणखी वाढल्याने मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यात जोरदार सुरू असलेल्या पावसाने रस्ता वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडी येथे रस्त्यावर आणि अस्वली रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी आले आहे. मुंबईवरून नाशिकला येणाऱ्या सर्व गाड्या घोटी, इगतपुरी रेल्वेस्टेशनवर थांबविण्यात आल्याने नाशिकच्या चाकरमान्यांना गाडीतच मुक्काम करावा लागणार असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे. पाऊस कधी कमी होईल आणि रस्ता आणी रेल्वे वाहतुक सेवा कधी सुरळीत होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.
सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरण भरल्याने या धरणातून १२०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणे १००% भरली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होणार असल्याने गोदावरी काठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढ्यामध्ये पोहायला जाऊ नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडून नये, विद्युत खांबापासून दूर रहावे, जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नये आणि पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.