शेतात अंगावर वीज पडून पाच जण ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना शेतात अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घटना आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. या घटनेत ठार झालेले चार जण एकाच कुटुंबातील आहेत. अन्य एका रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेचाही यात मृत्यू झाला.
रघुनाथ दशरथ पाटील (वय ५०), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय ४५), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय ३३), लहान सून लता उदय पाटील (वय ३०) आणि कल्पना भैय्या पाटील (वय ३५ सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.
रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापणीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस व महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.