राज्यातील ५० मतदारसंघात फिरणार ‘आप’ चा झाडू , ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या ५० जागा लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टी (आप) ने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५० जागांपैकी ८ उमेदवारांची घोषणा ‘आप’ने केली आहे. यात मुंबईतील ३ जागांचा समावेश आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीसोबत आप जाणार असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा चालू असल्याचे सांगितले जात होते त्याचे काय झाले हे मात्र समजू शकले नाही.
देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारा राजकीय पक्ष म्हणून आप ची ओळख असून अल्पावधीतच दिल्लीमध्ये या पक्षाने आपले सरकार स्थापन केले, पंजाब मध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे आणि गोवा राज्यामध्ये लक्षणीय वोट शेअर आप ने मिळवला आहे. दिल्लीमध्ये लोकांना सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्याचे अनेक उच्चस्तरीय आदर्श आम आदमी पक्षाने प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच अल्पावधीत ‘गव्हर्नन्स’बाबत स्वतःचा अनोखा ब्रँड तयार करण्यामध्ये आम आदमी पक्षाला यश आले आहे.
आपच्या नेत्या प्रीती शर्मा यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती ही भाजपची बी टीम आहे, असा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या निवडणुकीत ‘आप’ला घवघवीत यश मिळणार असून आप पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसेल असा दावाही त्यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती आपचे सचिव धनंजय शिंदे यांनी दिली.
‘आप’च्या पहिल्या यादीत ८ जणांचा समावेश असून यात जोगेश्वरी पूर्वमधून विठ्ठल लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीमधून दिलीप तावडे यांना आपने मैदानात उतरवले आहे. पुण्यातील पार्वतीमधून संदीप सोनावणे, चंद्रपूरमधील ब्रम्हपुरीतून पारोमिता गोस्वामी, कोल्हापूरमधील करवीरमधून आनंद गुरव, नाशिकमधील नांदगावमधून विशाल वाडघुले, आणि कोथ्रुडमधून अभिजित मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.