उदयनराजेंच्या इलाख्यात पवारांचा धमाका , कार्यकर्त्यांना दिला ” कामाला लागण्याचा ” सल्ला आणि गुलाल उधळायला बोलावण्याचे केले आवाहन !!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या इलाख्यात , साताऱ्यात येऊन जोरदार धमाका करीत कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले कि , पुढच्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पवार रविवारी साताऱ्यात होते. शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपात दाखल झालेल्या उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
त्यांच्या वयावरून बोलणाऱ्यांचा समाचार घेताना पवार म्हणाले कि , “काही लोक मला वयस्कर झालो आहे असे म्हणतात. मी त्यांना विचारतो काय बघितलं तुम्ही. मी नाशिकपासून ते हिंगोलीपर्यंत फिरून आलोय. गरज पडली तर सोळा नाही अठरा तास काम करेल. पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही.
सातारा शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य सवगत केले . रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की , “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?,” असं म्हणत उदयनराजे यांनी टोला लगावला.
उदयनराजे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, “मला जयंतराव सांगत होते, मी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. कारण त्या गादीबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्र धर्म ज्या गादीने शिकवला ती ही गादी आहे. यशवंतराव चव्हाण आणि क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे कामाला लागा. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह लोकसभा जिंका आणि मला गुलाल उधळायला बोलवा,” असं आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.