कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अर्थमंत्र्यांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचं प्रतिपादन करून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं कौतुक केलं आहे. “गेल्या काही आठवड्यांपासून सरकारकडून केल्या जात असलेल्या घोषणांवरुन सरकार उद्योगांसाठी भारतात मैत्रीपूर्ण वातावरण तयार करत असल्याचं स्पष्ट होत आहे,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताला भेडसावणाऱ्या मंदीवर मात करण्यासाठी आज कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या करामध्ये म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्समध्ये चांगलीच कपात करण्यात आली आहे. करकपातीचा निर्णय गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी जाहीर केला. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निर्णयाचं कौतुक केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी उचललेलं पाऊस ऐतिहासिक आहे. मेक इन इंडिया मोहिमेसाठी यामुळे प्रेरणा मिळेल. जगभरातून खासगी गुंतवणूक आकर्षित होण्यासही यामुळे मदत मिळेल. खासगी क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढेल तसंच जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल. यामुळे १३० कोटी भारतीयांसाठी कोणत्याही परिस्थितीत हा विजय आहे”.