भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल विमान , राफेल फायटर उडवण्याचा आनंद हा मर्सिडिझ चालवण्यासारखा : हवाई दल प्रमुख

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील बहुचर्चित पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहे. हे विमान फ्रान्सने दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय वायुदलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेल करारावरुन मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी वारंवार निशाणा साधला होता. तसेच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबांनींचा फायदा व्हावा म्हणून मध्यस्थाचे काम केले असाही आरोप केला होता. इतकंच नाही तर राफेल विमानाची किंमत आघाडीच्या काळापेक्षा वाढवण्यात आली असंही काँग्रेसने म्हटलं होतं.राफेल करारावरुन सत्ताधारी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. नेमका किती रुपयांचा करार झाला? हे निर्मला सीतारामन का सांगत नाहीत असा प्रश्न राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला होता. त्यामुळे राफेल कराराचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर चांगलाच गाजला होता.
दरम्यान काल अखेर फ्रान्सने पहिल्या विमानाची डिलिव्हरी भारताला दिली आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात पहिले राफेल दाखल झाले आहे. डेप्युटी एअर फोर्स चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी तासभर या विमानातून उड्डाण केले.
राफेल फायटर उडवण्याचा आनंद हा मर्सिडिझ चालवण्यासारखा…
राफेल फायटर उडवण्याचा आनंद हा मर्सिडिझ चालवण्यासारखाच आहे असं हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी म्हटलं आहे. ” एखादा माणूस जर मारुती कार चालवत असेल आणि त्याला मर्सिडिझ कार चालवण्यास दिली तर तो आनंदी होईल.मला अगदी तास आनंद राफेल फायटर जेट उडवल्यानंतर झाला” असं धनोआ यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जुलै महिन्यात बी.एस. धनोआ यांनी राफेल हे लढाऊ विमान फ्रेंच एअरबेसवरुन उडवलं होतं. त्याबाबतचा अनुभव त्यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात सांगितला. राफेल हे लढाऊ विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आल्याने वायुदलाचं बळ वाढणार आहे. राफेलची भूमिका एखाद्या गेम चेंजरसारखी असेल असंही धनोआ यांनी स्पष्ट केलं.
याच कार्यक्रमात त्यांना बालाकोट एअरस्ट्राईकबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, “भारतीय वायुदल कायमच अशा प्रकारच्या मोहिमेसाठी सज्ज असतं, अशा प्रकारची मोहिम राबवायची की नाही हा निर्णय मात्र सरकारकडून घेतला जातो. बालाकोटच्या वेळी आम्हाला आदेश देण्यात आले त्याआधीच मी अंदाज वर्तवला होता आणि वायुदलाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.” असंही धनोआ यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर “२००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर आणि २६/११ या मुंबई हल्ल्यानंतरही आम्ही सीमेच्या पलिकडे जाऊन एअरस्ट्राईक करण्यासाठी सज्ज होतो. मात्र त्यावेळच्या सरकारने याबाबतची राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही त्यामुळे आम्हाला एअरस्ट्राईक करता आला नाही” असंही धनोआ यांनी या कार्यक्रमात सांगितलं.