दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी दोन शिक्षकांनी मंत्रालयाच्या इमारतीवरून घेतल्या उड्या !!

मंत्रालयात आलेल्या दोन शिक्षकांनी राज्यातील ३०० दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दोघेही सुरक्षा जाळीत पडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे वृत्त आहे.
दरम्यान राज्य शासनाने मंत्रालयात घडत चाललेल्या अशा आंदोलनाचा धसका घेऊनच मंत्रालयातील खुल्या जागेत इमारतींच्या मध्ये जाळी लावली आहे त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांचे प्राण वाचले खरे पण यामुळे पोलिसांसोबत सर्वांचीच धावपळ उडाली.
हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. आपल्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने दोघांनीही सरकारचा निषेध करत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या मजल्याजवळच सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आली असून त्या जाळीत दोघेही अडकले. या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.