‘एक राष्ट्र, एक भाषा’ : अमित शहा यांच्या भूमिकेवर रजनीकांत यांचीही तीव्र प्रतिक्रिया

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर दक्षिण भारतत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या वादावर अभिनेते कमल हासन यांच्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे देखील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मैदानात उतरले आहेत. ‘तामिळनाडू काय, दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर हिंदी भाषा थोपवली जाऊ नये. तसं झाल्यास संपूर्ण दक्षिण भारत कडाडून विरोध करेल,’ असा इशारा रजनीकांत यांनी आज दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषा दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमात बोलताना ‘एक राष्ट्र, एक भाषा’ या सूत्राचं आग्रह धरला होता. देशात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी देशाच्या एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असं ते म्हणाले होते. शहा यांच्या या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हासन यांनी या प्रकरणी शहा यांना आव्हान दिलं होतं. कोणताही शहा किंवा सुलतान ‘विविधतेत एकता’ या घटनेतील तत्त्वाला आव्हान देऊ शकत नाही, असं ते म्हणाले होते. रजनीकांत यांनी त्यांच्याच सुरात सूर मिळवला आहे.
रजनीकांत यांनी या वादावर बोलताना म्हटले आहे कि , ‘एकच भाषा ही कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी चांगली असते. मात्र, आपण भारतात ते धोरण राबवू शकत नाही. कारण, भारतात कोणतीही एक भाषा कॉमन नाही. त्यामुळं तामिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. केवळ तामिळनाडूच नव्हे, दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर हिंदी लादली जाता कामा नये.