महाराष्ट्र विधानसभा २०१९ : बीड जिल्ह्यात पवारांची आक्रमक खेळी , धनंजय मुंडे , संदीप क्षिरसागर यांच्यासह पाच जणांची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी आक्रमक पद्धतीने प्रचार सुरु केला असून इतर पक्षांचे उमदेवार जाहीर होण्याच्या आत त्यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावे तडका-फडकी जाहीर केली आहेत.
बीड जिल्ह्यात आज पवारांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा करून त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत या पाचही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार, परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत.
भाजप-शिवसेनेच्या आक्रमक राजकारणाला शह देण्यासाठी पवारांनी अत्यंत काळजीपूर्वक उमेदवारांची निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या रणनीतीनुसार परळीतून धनंजय मुंडे निवडणूक लढणार आहेत. हा पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळं इथं भावा-बहिणीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचे ‘बंधन’ बांधणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना धडा शिकविण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं त्यांचा पुतण्या संदीप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं इथंही चुरशीची लढत होणार आहे.