शरद पवारांनी दिली पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असून नाशिकमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय बैठकांना सुरुवात झाली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत मतप्रदर्शन केलं. ‘जे गेले त्यांची काळजी करू नका, असे सांगतानाच सरकारविरुद्ध जनमत आहे आणि सरकार आपलेच येणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला.
आता फक्त निवडणूक हे लक्ष्य असल्याचं सांगत याच आठवड्यात निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करेल, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत. त्यांचा नाशिक दौरा झाल्यावर निवडणुका जाहीर होतील, असे वाटते असेही पवार पुढे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढणार आहे आणि उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत, असेही पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानीचे राजू शेट्टी तसेच जोगेंद्र कवाडेंचा पक्ष व डावे पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवतील व आघाडीचा प्रचार संयुक्तपणे करण्याचा आमचा विचार असल्याचेही पवार म्हणाले.
ईडीची नोटीस दाखवून माझ्या काही सहकाऱ्यांना धमकी देण्यात आली. मी नावं उघड करणार नाही मात्र आमच्यातून गेलेल्या काहीजणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर मला काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का?, इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला. माझी आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. निवडणुकीवर बहिष्कार टाका, ही त्यांची भूमिका होती. मात्र, त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही, असे पवार म्हणाले. झेंड्याबाबत अजित पवार यांचं मत वैयक्तिक आहे, पक्षाचं नाही. पक्षाचा झेंडा बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे. आपल्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला? याचा विचार त्यांनी करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे, असे पवार म्हणाले. मी पाकिस्तानबद्दल काहीही बोललो नाही. मित्रांशी बोलताना मी माझा अनुभव सांगितला. आपला क्रिकेट संघ पाकिस्तानात गेला तेव्हाचा तो अनुभव होता. आपल्या फलंदाजांनी धावा केल्यावर तेथील प्रेक्षक त्याचं स्वागत करत होते, असं मी म्हणालो होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.