सिद्धार्थ खरात राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे खाजगी सचिव

उच्च व तंत्रशिक्षण विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असलेलेआयु.सिद्धार्थ खरात यांनी केंद्रीय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांचे खाजगी सचिव म्हणून नवी दिल्ली येथील कार्यालयात नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिनांक १९ जुलै २०१९ रोजी श्री खरात यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते. महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिनांक १४ आॅगस्ट २०१९ रोजी त्यांच्या नावाला संमती दिली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सिद्धार्थ खरात यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ते दिनांक ३१ आॅगस्ट २०१९ रोजी कार्यमुक्त झाले.
सिद्धार्थ खरात हे मागील ५ वर्षापासून उच्च व तंत्रशिक्षण विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असून या काळात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहीला आहे. सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ सह सुमारे ३० विविध अधिनियम , सुमारे २५ विविध विद्यापीठे स्थापन करण्याचा , अनेक मंत्रीमंडळ प्रस्ताव सादर करण्याचा तसेच विविध शासन निर्णय काढण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या कडे आहे.
या व्यतिरिक्त अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक चळवळीतील महानुभावांशी त्यांचे जवळचे संबंध असून औरंगाबाद, जालना व बुलडाणा जिल्ह्यात अनेक सेवाभावी प्रकल्पांना त्यांनी चालना दिली आहे. सामाजिक जाणीव असलेला व शासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेला अधिकारी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे आस्थापनेवर खाजगी सचिव म्हणून झालेल्या नियुक्तीमुळे आयु. सिद्धार्थ खरात यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. आंबेडकरी चळवळीतील विविध स्तरातील कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ खरात यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.