भगवी शाल अंगावर घेत छगन भुजबळ यांनी स्वतः जाहीर केली येवल्यातून आपली उमेदवारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी आपण आहोत तिथेच खूश असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, दोन दिवसातच वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
छगन भुजबळ सध्या येवल्यात तळ ठोकून आहेत. बुधवारी त्यांनी येवला मतदारसंघातील गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ‘कोण आला रे कोण आला?’ अशा घोषणा देत शिवसैनिक आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या खांद्यावर भगवी शाल टाकून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी आपण येवल्यातूनच निवडणूक लढवरणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. परंतु, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवणार हे जाणीवपूर्वक त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
सोशल मीडियावर छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत ते येवल्यातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करताना दिसत आहेत. ‘लोकांना असे वाटत होते की छगन भुजबळ येवल्यात उभे राहणार नाहीत. ते इतरत्र उभे राहतील. मात्र, मी आज जाहीर करतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत मी येवल्यातून निवडणूक लढवणार’, असे छगन भुजबळ बोलताना दिसत आहेत.