Aurangabad : काळ आला होता पण वेळ नव्हती आली , सेवानिवृत्त अभियंता रेल्वे अंगावर जाऊनही वाचला … !!

सकाळी ८ ची वेळ . ठिकाण रेल्वे रूळ मुकुंदवाडी , औरंगाबाद . धोंडोपंत रामराव वाडीकर हे ७२ वर्षांचे गृहस्थ . सेवानिवृत्त अभियंता. मूळचे जालना जिल्ह्यातल्या वाडीचे राहणारे. आपल्या मुलाकडे औरंगाबादला आले होते. स्वप्ननगरी गारखेड्यात त्यांचा मुलगा धनंजय औषधी विक्रीचा व्यवसाय करतो. पहाटे वडील फिरायला म्हणून बाहेर गेले. फिरून घरी परतल्यानंतर त्यांनी पहिले कि , घराचे दार लावलेले आहे. त्यामुळे त्यांची पावले आणखी फिरण्यासाठी परत फिरली. ते थेट रेल्वे ट्रक , मुकुंदवाडी येथे आले. फिरत फिरत मनात कळत -नकळत आत्महत्येचा विचार आला. ८ वाजले होते नांदेडकडे जाणाऱ्या नगर सोल एक्सप्रेसचे वेळ झालेली . रेल्वे येत असल्याचे पाहून ७२ वर्षाचे धोंडोपंत रेल्वेरुळामध्ये झोपले. रेल्वे चालकाच्या हे लक्षात आले पण त्यालाही तत्काळ काही करता आले नाही . गाडी थांबवता , थांबवता काही डबे दोनदोपंत यांच्या अंगावरून गेले काय झाले म्हणून रेल्वे चालकाने रेल्वे ७-८ मिनिटे थांबवली प्रवासीही खाली उतरले तेंव्हा लक्षात आले कि , रेल्वे रुळामध्ये धोंडोपंत पडलेले आहेत. त्यांच्याकडे लोक धावले आणि त्यांना बाहेर काढले तेंव्हा लक्षात आले कि , धोंडोपंत सुखरूप आहेत. काळ आला होता पण जणू वेळ आली नव्हती.
या अपघाताने धोंडोपंत पूर्णतः आश्चर्यचकित झाले होते . काय बोलावे तेच त्यांना कळत नव्हते . आत्महत्या करायची एवढेच ते बोलत होते. बोलताना त्यांची बोबडी वळत होती. स्वतःचे नाव , गाव काहीही सांगता येत नव्हते. शेवटी लोकांनी त्यांना पुंडलिक नगर पोलिसांच्या स्वाधीन केले. धोंडोपंतांना बोलताच येत नसल्याने त्यांची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले. दरम्यान पोलीस ठाण्याचे प्रमुख एपीआय घनश्याम सोनवणे यांनी विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील आणि केपी जोशी यांना पाचारण केले. गोर्डे पाटील यांनी धोंडोपंत यांचे फोटो सर्व ग्रुपवर शेअर केले परंतु त्यांची ओळख पटेना .
दरम्यान फिरायला गेलेले वडील घरी परत न आल्याने शोधाशोध करून शेवटी त्यांचा मुलगा धनंजय मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार करण्यासाठी आला तेंव्हा वडील पोलीस ठाण्यात असल्याचे दिसले . सर्व वृत्तांत समजल्यानंतर त्यांना रडू कोसळले. शेवटी आपल्या पित्याला सोबत घेऊन धनंजय आपल्या घरी गेला.
धोंडोपंत वडीकर हे जालना शिळा परिषदेतील सेवानिवृत्त अभियंता आहेत . परतूर येथून ते निवृत्त झाले होते . पत्नीचे निधन झाले आहे. मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. काही दिवसांपूर्वीच ते मुलाकडे आले होते. मुलाच्या घरी त्याच्या सासूची शस्त्रक्रिया झाल्याने ती मुलीकडे वास्तव्यास आहे. धोंडोपंत फिरायला जाऊन परत आल्यानंतर मुद्दाम घर उघडले नाही असा समज झाल्याने आत्महत्येचा विचार करून ते रेल्वे रुळाकडे गेले आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला परंतु ते सहीसलामत वाचले विशेष म्हणजे त्यांना कुठलाही मार लागला नाही. या घटनेविषयी सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.