सर्वोच्च न्यायालयाचा पी. चिदंबरम यांना दिलासा , त्यांना घरातच स्थानबद्ध करण्याचे आदेश, कोठडीत एक दिवसाची वाढ

INX मीडिया घोटाळा प्रकरणी अंतरिम जामीन मिळावा या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहे. शिवाय कनिष्ठ न्यायालयाने जर चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये, त्याऐवजी त्यांना घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिलासा आहे.
दरम्यान आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. कोर्टाने चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत एक दिवसानं वाढ केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा एक दिवसानं कोठडीतील मुक्काम वाढला असून उद्या त्यांच्या अंतरिम जामीनावर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही आणि जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील. सुनावणीच्या वेळी चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की चिदंबरम ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. यामुळे कोणाला काही समस्या नसायला हवी. सुप्रीम कोर्टाने सीबीआयला आदेश दिला आहे की चिदंबरम यांच्याकडून अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध दाखल याचिकेवर आपण आपलं उत्तर द्या. चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.