राष्ट्रवादीचा त्याग , उदयनराजेंचे तळ्यात -मळ्यात , खासदार अमोल कोल्हे यांनी केली मनधरणी पण राजे आपल्या निर्णयाबद्दल बोलले नाहीत

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असली तरी राजेंचे अद्याप तळ्यात मळ्यात चालू असल्याने उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जाऊ नये यासाठी अमोल कोल्हे त्यांची मनधरणी करत असल्याचे वृत्त आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही.
रविवारी भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी “भाजपाची वाटचाल सध्या जोरात सुरु आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, भाजपाच्या एकंदरीत कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत. कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत कंपन्या बंद पडत आहेत. गेल्या चार-पाच वर्षात साताऱ्यात विकास कामे झाली. परंतु सर्वांनी पा ठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो. सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तेथे जाणेही योग्य नाही.” असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं. त्यानंतर आता उदयनराजे यांनी पक्ष सोडून भाजपात जाऊ नये म्हणून अमोल कोल्हे हे त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना भेटायला गेले.
उदयनराजे भोसले यांच्या घरी आज गणरायाचं आगमन झालं. त्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या घरी हजेरी लावली. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली मात्र या चर्चेत नेमकं काय घडलं ते समजू शकलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे हे त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना राजे म्हणाले कि , अमोल माझे मित्र आहेत . त्याला राजकीय रंग देऊ नये. माझा निर्णय माझे कार्यकर्ते घेतात मी नाही. काँग्रेस राष्ट्वादीचे सरकार असताना आमची कामे झाली नाही. जनतेच्या कामासाठी मी भांडलो , माझ्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल झाले . हा विषय आजचा नाही . तर अमोल कोल्हे म्हणाले मी मावळा , राजेंचे मन कसे वळवणार ? ते स्वयंभू आहेत. कोणताही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत.