चांद्रयान २: ऑर्बिटरपासून विक्रम लँडर वेगळा, चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकांनी सोमवारी दुपारी यशस्वीरित्या विक्रम लँडरला चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरपासून वेगळे केले. विक्रम लँडर आणि त्यामध्ये असलेल्या प्रग्यान रोव्हरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. आणखी पाच दिवसांनी सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेमुळे चंद्राबद्दल आजवर अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी जगाला समजणार आहेत.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे लँडिंग होणार असून अजूनपर्यंत कुठलाही देश चंद्राच्या या भागात पोहोचलेला नाही. प्रग्यान हा सहा चाकी रोव्हर असून सध्या तो विक्रम लँडरमध्ये आहे. दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी विक्रम लँडर चांद्रयान-२ पासून वेगळा झाला व चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला. चांद्रयान-२ पुढचे वर्षभर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.
भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. कारण यानापासून लँडरला वेगळे करण्याची एक कठीण प्रक्रिया होती. सात सप्टेंबर मोहिमेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असेल. त्यादिवशी विक्रम लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरतील. प्रग्यान रोव्हर चंद्राचा पृष्ठभाग, पाणी, खड्डे यासंबंधीची माहिती इस्रोला पाठवेल. यातून चंद्राबद्दल अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकते.
लँडिंगच्यावेळी शास्त्रज्ञांसमोर चंद्रावरच्या धुळीचे आव्हान असेल. इस्रो पहिल्यांदाच अशा प्रकारे चंद्रावर लँडिंग करणार आहे. विक्रम लँडरच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश बनू शकतो. याआधी अमेरिका, यूएसएसआर आणि चीनच्या यानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे. त्यापूर्वी रविवारी संध्याकाळी इस्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान-२ ची अंतिम कक्षा सुधारणा यशस्वीरित्या पार पाडली.