मुंबई: मालाडमध्ये सिलिंडर स्फोटात १ ठार, ४ जखमी

मालाड येथील एमएचबी वसाहतीत झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर चाळ कोसळून एका ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले आहेत. मंजू आनंद असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटानंतर मंजू आनंद या महिलेच्या अंगावर चाळीची भींत कोसळल्यानंतर तिला तातडीने बाहेर काढून जवळच्या सामान्य प्रशासन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
जखमींपैकी ममता पवार ही २२ वर्षीय महिला सुमारे ८० टक्के भाजली असून तिची प्रकृची गंभीर असल्याचे समजते. त्याच प्रमाणे अश्विनी जाधव ही तरुणीही या दुर्घटनेत १५ टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर मालाड मालवणी येथील भारत माता शाळेसमोरील चाळ क्रमांक ९१ कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.
स्फोटात जखमी झालेल्यांची नावे : शीतल काटे (४४ वर्षे), सिद्देश गोटे (१९), ममता पवार (२२), अश्विनी जाधव (२६)