काँग्रेसच्या ३७० कलमाच्या विरोधातील वक्तव्याचा पाकिस्तानकडून वापर, अमित शहा यांनी काढली काँग्रेसची लाज

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविले. त्याविरोधात काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पाकिस्तानने भारताविरोधात हत्यार म्हणून वापर सुरू केला आहे. त्याबद्दल काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. दादरा नगर हवेली येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
अमित शहा म्हणाले कि , आजही राहुल गांधींनी ३७० कलमाविरोधात टीका केली तर त्याचे पाकिस्तानकडून कौतुक होते. राहुल यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानने त्यांच्या याचिकेत समावेश करून आंतरराष्ट्रीय मंचावर त्याचा भारताविरोधात वापर केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसला त्याची लाज वाटली पाहिजे.
जेएनयूमध्ये देशाविरोधात करण्यात येणारी घोषणाबाजी असो, सर्जिकल स्ट्राइक असो की एअर स्ट्राइक असो प्रत्येक गंभीर विषयांवेळी काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसला नेमकं कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं आहे? असा सवाल त्यांना विचारावासा वाटतो, असंही शहा म्हणाले.
अनुच्छेद ३७० आणि ३५-ए हे दोन्ही अनुच्छेद देशाच्या अखंडतेला बाधक होते. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही दोन्ही कलम रद्द केली. मोदींशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती हे काम करूच शकत नाही, असं सांगतांना काही लोकांच्या तीन तीन पिढ्यांनी देशावर राज्य केलं. पण त्यांनाही ही कलम रद्द करता आली नाहीत, असा टोला शहा यांनी काँग्रेसला लगावला.