“अच्छे दिन ” चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था केली पंक्चर : प्रियांका गांधी

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारनं अर्थव्यवस्था पंक्चर करून टाकली आहे,’ अशी टीका प्रियांकांनी केली आहे. प्रियांका यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मंदीचं वातावरण आहे. ऑटोमोबाइल उद्योगासह अन्य क्षेत्रांत नोकरकपातीला सुरुवात झाली आहे. जीडीपी दर खाली आला आहे. याच मुद्द्यांवरून प्रियांकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. ‘देशाच्या अर्थव्यवस्थेचे किती हाल झाले आहेत हे जीडीपीच्या दरावरून स्पष्ट दिसतं आहे. ना जीडीपी वाढला आहे ना रुपया मजबूत झाला आहे. रोजगार मिळेनासे झाले आहेत. अर्थव्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा हा कारनामा कोणाचा हे आतातरी सांगून टाका,’ असं आव्हानच प्रियांकांनी सरकारला दिलं आहे.