विकासाची वाट धरून जाणाऱ्यांना भाजपने कोणत्या विकासाची वाट दाखवली म्हणून ते तिकडे जाताहेत हे समजले नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. श्रीरामपुरात त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली तेंव्हा पक्षांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले कि , विकासाची वाट धरुन आम्ही राष्ट्रवादी सोडतो आहोत असे नेते सांगत आहेत. असं सांगून राष्ट्रवादी सोडणारे नेते हे विसरुन गेले आहेत की इतकी वर्षे त्यांचा विकास राष्ट्रवादीमध्ये असतानाच झाला. आता सेना भाजपाने त्यांना कोणत्या विकासाची वाट दाखवली म्हणून ते तिकडे जात आहेत ते कळू शकलेलं नाही असाही टोला शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना लगावला. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांचा उल्लेख एका पत्रकाराने नातेवाईक असा करताच शरद पवार चांगलेच चिडले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्ष सोडून अनेक नेते भाजपा आणि शिवसेनेत जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली जनता हे चित्र पाहतेच आहे. अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आणि नातेवाईक असा उल्लेख केला असता ते चांगलेच संतापलेले पाहण्यास मिळाले.
हि पत्रकार परिषद चालू असताना त्यांना पत्रकाराने जेंव्हा विचारले कि , पद्मसिंह पाटील जे तुमचे नातेवाईक आहे तेही तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं कळतं आहे . या प्रश्नावर शरद पवार चांगलेच संतापले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध ? तुम्ही चुकीचं बोलत आहात, असं बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचं? माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. इतक्यात त्यांना इतर पत्रकारांनी बसवलं आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत बसण्यास सांगितलं.