काश्मीरवर आता चर्चा नाही , चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर , व्यंकय्या नायडूयांनी पाकिस्तानला सुनावले

काश्मीर हा आता चर्चेचा मुद्दाच उरलेला नाही. चर्चा होणारच असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात देण्याबाबत व्हायला हवी, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूयांनी पाकिस्तानला बजावले. येथील नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काश्मीरबाबत काय चर्चा करणार? हा तर भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे नमूद करतानाच आता खरं तर इतर मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. ही चर्चा अर्थात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागावर म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरवर व्हायला हवी. हा भाग पाकने भारताच्या स्वाधीन करायला हवा, असे मत नायडू यांनी व्यक्त केले.
भारत हा शांतताप्रिय देश आहे. आम्ही कधीही युद्धाची भाषा केली नाही. मात्र, कुणी आमच्यावर हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल, असेही नायडू म्हणाले. काश्मीर मुद्द्यावरून पाककडून जे इशारे दिले जात आहेत त्याकडे नायडू यांच्या बोलण्याचा रोख होता. मनुष्यहानीची पर्वा न करता आमचा एक शेजारी देश दहशतवादाला खतपाणी घालत आहे. दहशतवाद्यांना रसद पुरवत आहे. त्यांचे प्रशिक्षण तळ उभारले जात आहेत, अशी टीकाही उपराष्ट्रपतींनी पाकचे नाव न घेता केली. भारत युद्धासाठी नव्हे तर स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रसज्ज होत आहे, असेही ते म्हणाले.