सिने दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांच्या कारला अपघात, एअर बॅगमुळे सर्व जण सुखरूप

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची चर्चा दिवसभर चालू असतानाच प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या कारला आज रात्री ११ च्या सुमारास सासवडजवळ हिवरे गावात अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणेही होते. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
प्रवीण तरडे, विशाल चांदणे आणि अभिनेते रमेश परदेशी हे कारने जात होते. सासवडजवळ हिवरे गावात महादेव मंदिरासमोर त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. एअर बॅगमुळे ते बचावले. अपघाताचे वृत्त कळताच सासवड पोलीस तात्काळ अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आणि अपघातग्रस्तांना साहाय्य केले . दरम्यान स्वतः प्रवीण तरडे, परदेशी आणि चांदणे हे सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.